कोकण विकासाला पर्यटन व्यवसायाची किनार…. !

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

पर्यटन व्यवसायाला यापुढे अधिक महत्व देण्याची आवश्यकता आहे. आज येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे. कोकणात किनारपट्टी भागातील पर्यटनस्थळांवर सर्वाधिक पर्यटक हजेरी लावतात. त्याचबरोबर अन्य पर्यटन स्थळांवरही पर्यटक गेले पाहिजेत, रमले पाहिजेत हे पहाण्याची जबाबदारी आपलीच आहे. कोकणात पर्यटन व्यवसायातूनच रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे…

अखंड महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. निसर्ग चक्रातील अनियमीततेने शेती-बागायतीचे अस्थिरता आहेच. येणारा हंगाम फळ बागायतीला कसा जाणार या साशंकतेने अवघ कोकण विवंचनेत असताना आंबा, काजू बागायतीतून काय येणार आणि वर्ष कस जाणार ही विवंचना सर्वांनाच आहे. परंतु यातही एक बाब थोडीशी कोकणवासियांना दिलासा देणारी आहे. ती कोकणातील पर्यटन व्यवसाय चांगलाच वृद्धींगत होत आहे. अर्थात गेल्याकाही वर्षात पर्यटन व्यवसाय वाढत चालला आहे. पर्यटनकांनाही कोकण अधिक सुरक्षित वाटते. यामुळे दरवर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. कोकणात असंख्य पर्यटनस्थळ आहेत. यामुळे कोकणात येणारा पर्यटक भारावून जातो. काय पहायच आणि याकडे कसे दुर्लक्ष करायचे असेच काहीसे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच होत असते. अर्थात अजुनही पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या काही मूलभूत सुविधाही निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये असंख्य पर्यटनस्थळ आहेत. एखाद्या पर्यटकांने जरी ठरवल की कोकणातील एका जिल्ह्यात पर्यटनासाठी फिरायच ठरवल तरी त्याला पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी मोठा कालावधी लागेल. इतकी पर्यटनस्थळ आहेत. एकीकडे दुष्काळी स्थिती असताना पर्यटन व्यवसायाचा विषय यासाठीच घेतला गेला आहे. पर्यटन व्यवसायाला यापुढे अधिक महत्व देण्याची आवश्यकता आहे. आज येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे. कोकणात किनारपट्टी भागातील पर्यटनस्थळांवर सर्वाधिक पर्यटक हजेरी लावतात. त्याचबरोबर अन्य पर्यटन स्थळांवरही पर्यटक गेले पाहिजेत, रमले पाहिजेत हे पहाण्याची जबाबदारी आपलीच आहे. कोकणात पर्यटन व्यवसायातूनच रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
आंबा, काजू, रतांबा, माड, पोफळी, फणस यांच्या बागा आहेत. या बागांमधून जरी मिळणारे उत्पन्न कमी-अधिक होत आहेच याचसाठी बागायतदार शेतकऱ्यांनी पर्यटन व्यवसायात स्वारस्य दाखवत आंबा, काजू बागायतीत येणारा पर्यटक कसा रमेल याची काही कमी खर्चामध्ये काय व्यवस्था करता येईल? हे पाहिले गेल्यास मला वाटत पर्यटकांसाठीही ती एक वेगळी मेजवानी ठरेल. कोकणातच नव्हेतर महाराष्ट्रातील काही भागात कृषी पर्यटकाला प्राधान्य देऊन बागायतदार शेतकऱ्यांनी पर्यटन व्यवसायातून बऱ्यापैकी व्यवसाय उभारला आहे. अनेक बागायतदार शेतकऱ्यांना ही संकल्पना राबवणे शक्य आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे आणि ज्यांना अन्य सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे त्यांनी निश्चितपणे हा पर्याय निर्माण करून त्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. येणाऱ्या आर्थिक अडचणीच्या काळात हा एक नवा पर्याय निर्माण होऊ शकतो.
कोकणातील काही भागात म्हणजे रत्नागिरी, रायगड, जिल्ह्यात कृषि पर्यटनाचा पर्याय निर्माण करण्यात आला आहे. हे करत असताना बागायतीला कोणताही धोका पोहचणार नाही याची काळजी घेत हे करण्याची जी आवश्यकता आहे त्याचे तंतोतंत पालन करीतच हे सर्व करण्यात आले आहे. पर्यटन व्यवसाय हा वाढतच राहणार आहे. कोकणच्या बाजूला असणाऱ्या गोवा राज्यात जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटक येत असले तरीही गोव्याला पर्यटनासाठी जाण्यासाठी आता पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोकणात आंतरराष्ट्रीय पर्यटकही येऊ लागले आहेत. ताज, ओबेरॉय सारख्या पंचतारांकीत हॉटेलचे प्रकल्पही नजीकच्या काळात उभे रहात आहेत. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा रहात आहे. त्याचा निश्चितच फायदा कोकणाला होईल. पंचतारांकित हॉटेलमुळे येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाचा परिणाम कोकणातील बाजारपेठांवर आणि आर्थिक उत्पन्न वाढीवर दिसेल. एकीकडे पर्यटन व्यवसाय वाढत असताना कोकणातील आंबा, काजू, नारळ, फणस, रतांबा अशा सर्वच फळांना मार्केटही निर्माण होईल.
आपल्या कोकणातील फळ बागायतदारांच्या दुर्लक्षामुळे कर्नाटकच्या आंब्याची विक्री रस्तो-रस्ती होताना दिसते. आंध्रची कुटुंब कोकणच्या हमरस्त्यांवर येऊन आंबा विक्री करतात. दुर्दैवाचा भाग म्हणजे कोकणातील हापूसच्या नावाने ही आंबा विक्री होते. आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकाला माहिती नसते की हा कोकणातील हापूस आंबा आहे की आणखी कुठला आंबा आहे. आपणच आपला स्वत:चा ब्रॅण्ड हरवत चाललो आहोत. तो ब्रॅण्डही आपण जपला पाहिजे. यासाठीच्या ज्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पर्यटन व्यवसायाला चालना देत असताना आपणाकडे जी फळ तयार होतात. त्याचा आस्वाद येणाऱ्या पर्यटकांना देत त्यातून एक व्यवसाय उभारणी करायची आणि आर्थिक सक्षमताही निर्माण करायची आहे.