भक्तियोगाच्या १२ व्या अध्यायाचे पाठांतर; तीन गटांत स्पर्धेचे आयोजन, २० ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत
वाडा : प्रतिनिधी
संस्कृतीसंवर्धनातून कौशल्यविकास या संकल्पनेतून कै. नीता निळकंठ दीक्षित स्मरणार्थ, दीक्षित फाऊंडेशन पुरस्कृत आणि अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा आयोजित वेदमूर्ती कै. श्रीपाद काळे स्मृती श्रीमद्भगवद्गीता अध्याय पाठांतर स्पर्धा २०२६ चे आयोजन गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायातील ‘भक्तियोगा’चे पाठांतर करावयाचे आहे. स्पर्धेला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होईल.
स्पर्धेचे आयोजन तीन गटांत करण्यात आले आहे. तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बालगट, इयत्ता चौथी ते सातवीसाठी पहिला गट आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट असे वर्गीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये भगवद्गीतेविषयी आवड निर्माण करणे, पाठांतर कौशल्य विकसित करणे आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना पाठांतरासाठी नेमलेल्या अध्यायाची ऑडिओ क्लिप आणि पीडीएफ प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच्या आधारे स्पर्धकांनी पाठांतर करायचे आहे. पाठांतर करताना शुद्ध उच्चार आणि ऑडिओ क्लिपप्रमाणे स्वरबद्ध पठण करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. बालगट आणि पहिल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी एक हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या गटात प्रथम क्रमांकासाठी १,५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी एक हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७५० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. तिन्ही गटांसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ५०० रुपये देण्यात येणार आहेत. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी स्मृतिचिन्ह दिले जाणार नाही.
स्पर्धकांनी २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे स्थळ अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा असे असून, अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक भूषण दातार सर यांच्याशी ८०८७८६८८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संकल्पना व अंतिम निर्णयाचा अधिकार लोकल कमिटी आणि स्कूल कमिटी, वाडा यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे.













