आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीतील जि. प. शाळा क्र. २ च्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :“ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. कै. सुधाताई कामत विद्यामंदिर शाळा नंबर २ च्या या नूतन आणि सुंदर इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथील कै. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक पीएम श्री शाळा नंबर २ च्या नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
हा भूमिपूजन सोहळा अत्यंत भव्य आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सावंतवाडी नगरपरिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर तसेच पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी नमूद केले की, शाळा नंबर २ ची इमारत बांधण्यात अनेकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा नेहमीच अभिमान वाटत असून येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. इमारतीचे बांधकाम दर्जेदार होणार असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी विशेष सहकार्य पुरवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सुधाताई कामत शाळेचा अभिमान संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला असल्याचे सांगत ही इमारत लवकर उभी राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी शिक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांनी आजचा दिवस सावंतवाडी शहरासाठी ऐतिहासिक व सुवर्णमय असल्याचे सांगत पंचायत समितीच्या वतीने शाळेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या सोहळ्यास नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका दुलारी रांगणेकर, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष भारती मोरे, केंद्रप्रमुख श्री. ठाकूर, सुरज परब, सामाजिक कार्यकर्ते नंदू गावडे, आबा केसरकर, माजी केंद्र प्रमुख म. ल. देसाई यांच्यासह पालक अनंत जाधव, इतर पालकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













