चिपळूण पॉवरहाऊस येथे बाराचाकी ट्रकची इर्टिगा कारला मागाहून धडक; दोघे जखमी

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण पॉवरहाऊस परिसरात मध्यरात्री गतिरोधक ओलांडणाऱ्या एका इर्टिगा कारला भरधाव बाराचाकी ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
कल्याण (पश्चिम) येथील मुरबाड रोड परिसरातील रहिवासी संकेत शिवाजी गुरव (३५) हे १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास आपल्या कुटुंबासह अर्टिगा कारने (क्रमांक एम.एच. ०५ इ.क्यू. ३५२४) जात असताना, चिपळूण पॉवर हाऊसजवळील गतिरोधकावर त्यांनी गाडीचा वेग कमी केला. नेमक्या त्याचवेळी पाठीमागून अत्यंत वेगाने व बेदरकारपणे आलेल्या भारत बेंझ कंपनीच्या बाराचाकी ट्रकने (क्रमांक एम.एच. १२ एल.टी. २०५७) या अर्टिगा कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील श्वेता शिवाजी गुरव आणि शिवाजी बाबाजी गुरव हे दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर संकेत गुरव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रकचालक लालचंद कुंजू महातो (सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी; मूळ रा. तोपचाची, धनबाद, झारखंड) याच्याविरुद्ध वाहनाचा वेग अनियंत्रित ठेवून निष्काळजीपणे अपघात घडवून आणल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.