साताऱ्यातील विशेष केंद्रात उपचारासाठी दाखल
देवरूख | प्रतिनिधी : निसर्गातील एक दुर्मिळ आणि देखणा प्राणी म्हणून ओळखला जाणारा ‘ब्लॅक पँथर’ (काळा बिबट्या) संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-देवरूख रस्त्यावर 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली.

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांना हा ब्लॅक पँथर निपचित पडलेला आढळला. तपासणीसाठी बोलावण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज शेट्ये यांनी बिबट्याची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॅक पँथर नर असून त्याचे वय अंदाजे एक वर्ष आहे. उपासमारीमुळे तो अत्यंत अशक्त झाला होता, त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता.
वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर (कोल्हापूर) आणि डॉ. निखिल बनगर (सातारा) यांच्यासह इतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, त्याला पुढील काही दिवस देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे.
रत्नागिरी आणि देवरूख येथे ब्लॅक पँथरवर उपचारासाठी आवश्यक विशेष सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि सध्याच्या वातावरणातील बदलांमुळे त्याच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी वनविभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला पुढील उपचारांसाठी साताऱ्यातील टीटीसी (टायगर ट्रान्झिट सेंटर) या विशेष केंद्रात पाठवण्यात आले आहे.
विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. या दुर्मिळ प्राण्याच्या सुटकेसाठी आणि उपचारासाठी वनविभाग करत असलेल्या प्रयत्नांचे वन्यजीवप्रेमींकडून कौतुक होत आहे.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, असे दुर्मिळ किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास, कृपया स्वतःहून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीत तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधावा.











