खेडमध्ये स्वामी समर्थ मंदिराजवळील धोकादायक खड्डा बुजवला; नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांची तातडीने दखल

लोखंडी प्लेट बसवून वाहतुकीचा मार्ग केला सुरक्षित; लवकरच मोरीचे काम सुरू होणार

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ मोरीवर पडलेल्या धोकादायक खड्ड्याची नगराध्यक्ष सौ. माधवीताई बुटाला यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार खेड नगरपरिषद प्रशासनाने खड्ड्याच्या ठिकाणी लोखंडी प्लेट बसवून तात्पुरती उपाययोजना केली असून, हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नगराध्यक्षांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
खेड-भरणे या मुख्य मार्गाला मराठा भवन परिसरातून जोडणारा रस्ता गेल्या काही दिवसांपासून मोरीवर पडलेल्या खड्ड्यामुळे चर्चेत होता. या मार्गावरून दररोज नागरिकांची तसेच लहान-मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर मोरीवर खड्डा पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वाहनांची वर्दळ असताना या खड्ड्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली जात होती.
या परिस्थितीची माहिती परिसरातील सुजाण नागरिकांनी दूरध्वनी द्वारे खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने संबंधित ठिकाणी लोखंडी प्लेट बसवून खड्ड्यामुळे निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी पावले उचलली. परिणामी, या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली आहे.
मात्र, लोखंडी प्लेट बसवून करण्यात आलेली ही उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे. संबंधित मोरीची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे आवश्यक असून, लवकरच या ठिकाणी मोरीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. माधवीताई बुटाला यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शहरातील सार्वजनिक रस्ते, मोऱ्या आणि वाहतुकीशी संबंधित धोकादायक ठिकाणांची वेळेत दुरुस्ती होणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळील खड्ड्याची तातडीने दखल घेऊन करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आता या ठिकाणी मोरीचे कायमस्वरूपी काम लवकर सुरू होऊन रस्त्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.