गोळवशी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा, गावाच्या वतीने सत्कार
संतोष कोत्रे
लांजा: तालुक्यातील गोळवशी गावची सुकन्या असलेल्या कु. स्वरा रामदास जोगळे हिची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल गोळवशी गावाच्या वतीने तिचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
कुमारी स्वरा हिला कबड्डी मध विशेष आवड होती. स्वराने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद आहे. तिला लहानपणापासून गावातील श्री. महादेव खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनासोबतच स्वराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.
स्वराच्या या निवडीमुळे गोळवशी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आगामी विभागीय कबड्डी स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करून गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गोळवशी गावातील ग्रामस्थांच्या वतीने स्वराला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.












