हिंदळे वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ व ग्रंथोत्सव उत्साहात संपन्न!

▪️माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम; उत्कृष्ट वाचकांचा विशेष गौरव


​मसुरे | झुंजार पेडणेकर :भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ‘हिंदळे ग्रामोन्नती मंडळ, हिंदळे’ संचलित हिंदळे वाचनालयात सन २०२५-२६ या वर्षात खरेदी केलेल्या नवीन पुस्तकांचा ‘ग्रंथोत्सव’ सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आला होता.
​या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन हिंदळे भंडारवाडा येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. धर्मराज धुरत यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच त्यांच्या ‘अग्निपंख’ या प्रसिद्ध आत्मचरित्राचे अनावरण करून करण्यात आले.
​कार्यक्रमप्रसंगी कु. स्वरांजली योगेश बांदल हिने ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर आपले विचार मांडताना वाचनाचे महत्त्व व त्याचे आयुष्यातील फायदे अत्यंत सोप्या शब्दांत विशद केले.
​ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. धर्मराज धुरत म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे तरुण पिढी पुस्तकांपासून काहीशी दुरावत आहे. अशा काळात वाचनालयाने आयोजित केलेला हा ग्रंथोत्सव कौतुकास्पद आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तके ही आपली सर्वात चांगली मित्र असतात. नियमित वाचनामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर विचारांना परिपक्वता येते, कल्पनाशक्ती समृद्ध होते आणि व्यक्तिमत्त्व घडते. प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास तरी अवांतर वाचनासाठी दिला पाहिजे.” तसेच त्यांनी वाचनालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे व धडपडीचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले.
▪️​विविध पुरस्कारांचे वितरण
​या प्रसंगी सन २०२५-२६ या वर्षासाठी वाचनालयातर्फे नियमित व उत्कृष्ट वाचकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले: ​नियमित वृत्तपत्र वाचक: श्री. मंगेश रमाकांत हिंदळेकर,
​उत्कृष्ट बालवाचक: कु. शिवंजली योगेश बांदल व कु. रोहिणी कुरेकुंदे.
​उत्कृष्ट वाचक (प्राथमिक गट): कु. ध्रुवी मंगेश हिंदळेकर व कु. मृण्मयी रोहित खडपे
​वाचन सहभाग पुरस्कार: कु. अंजलि अमोल हिंदळेकर व कु. करण संदिप मयेकर
​उत्कृष्ट महिला वाचक: सौ. विनया तावडे.
​ग्रंथोत्सवात ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांचा सर्व उपस्थित वाचकांनी मनमुराद आस्वाद घेतला. यामध्ये कथा, कादंबरी, चरित्रे, नाटके, कवितासंग्रह, धार्मिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके आणि बालवाचन साहित्याचा समावेश होता.
​ ग्रंथपाल सौ. मिताली मंगेश हिर्लेकर यांनी आभार मानले. सर्व नियोजनात लिपिक श्री. प्रकाश बोरकर तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
​या कार्यक्रमास शिक्षक श्री. योगेश बोडके, शिक्षिका सौ. शितल मयेकर, अंगणवाडी सेविका सौ. सरिता संतोष आचरेकर, मदतनीस वैशाली रघुनाथ तेली, संपर्क फौंडेशन शिक्षिका उमा राहुल पारकर, सौ. राणे, निर्झरा हिंदळेकर, सारिका बोडके, सौ. मिठबांवकर यांच्यासह अनेक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.