दीपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रोत्सवाचा आनंद; संगीताच्या तालावर फुलला भक्ती आणि उत्साहाचा संगम
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
शक्तीची आराधना करणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भक्ती, आनंद आणि उत्साहाची सुंदर अनुभूती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत पाहायला मिळाली. देवीच्या नामघोषात आणि संगीताच्या तालावर जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांनी रास गरब्यात सहभागी होत नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखाली रंगलेल्या या रास गरब्याने काही काळ जिल्हा परिषद परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि चैतन्याचा उत्सव! याच भावनेतून महिला सदस्यांनी एकत्र येत रास गरब्याच्या माध्यमातून देवीच्या आराधनेत सहभाग घेतला. संगीताचे सूर, तालबद्ध पावले आणि चेहऱ्यावरील आनंद यामुळे या सोहळ्याला विशेष रंगत आली. दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून काही क्षण बाजूला होत महिला सदस्यांनी एकमेकींसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.
रास गरब्याच्या माध्यमातून केवळ उत्सवाचा आनंदच नव्हे, तर एकजुटीची आणि आपुलकीची भावना देखील अनुभवायला मिळाली. नवरात्रीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिला सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने स्त्रीशक्तीचा उत्सव अधिकच खुलला. देवीच्या भक्तीने भारलेल्या या वातावरणात जिल्हा परिषदेतही नवरात्रोत्सवाची रंगत अनुभवायला मिळाली. जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर सर्व महिलांनी हा उत्सव साजरा केला.













