जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र
खानोली जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक शाळेचा शारदास्तव मोठ्या नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विजय नाईक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते तर प्रमुख मान्यवरांमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, लोककला अभ्यासक सुप्रसिद्ध निवेदक प्रा.वैभव खानोलकर यांना विशेष आमंत्रित केले गेले होते.
एक समृद्ध लोककला दशावतार या त्यांच्या बहुचर्चित पुस्तकाला नुकताच राज्यस्तरीय श्रीस्थानक पुरस्कार प्राप्त झाला. प्रा.वैभव खानोलकर यांचे प्राथमिक शिक्षण शाळा खानोली नंबर एक या ठिकाणी झाले, प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या वतीने त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात अनेक गोष्टींचा उलगडा करताना प्रा खानोलकर म्हणाले कि,स्वप्न पाहणारे अनेक असतात; पण त्या स्वप्नांसाठी सातत्याने मेहनत करणारेच इतिहास घडवतात.
कोणत्याही क्षेत्रात जा,मात्र आपल्या मातीशी, आपल्या शाळेशी आणि आपल्या गावाशी नाते कायम ठेवा.
यशस्वी झाल्यानंतर आपल्या शाळेला विसरू नका. ज्या शाळेने आपल्याला घडवले, आपण ज्याच्यामुळे घडलो त्या सगळ्या बाबत आपण नेहमीच कृतज्ञतेने वागले पाहिजे भले ते तुमच्या विरोधात गेले तरी सुद्धा.
जिवनात आपण कुठे पोहोचलो, यापेक्षा आपल्यामुळे किती जणांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली, हे अधिक महत्त्वाचे आहे.
ध्येय मोठे ठेवा, विचार सकारात्मक ठेवा, मेहनतीशी मैत्री करा पण माणुसकीशी नाते कधीही तोडू नका.
ज्या दिवशी तुमचे आई-वडील तुमच्याकडे अभिमानाने पाहतील, शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे समाधान दिसेल आणि तुमच्या कर्तृत्वा मुळे तुमच्या शाळेचे नाव उज्ज्वल होईल, त्या दिवशी तुमच्या शिक्षणाचे खरे सार्थक झाले असे समजा. या विचारा सोबत त्यांनी
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या विचारात घेऊन शासनाने सुद्धा प्राथमिक शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देताना शिक्षकांवर शिक्षणा व्यतिरिक्त जो अतिरिक्त कामाचा भार आहे तो कमी केल्यास निश्चित शिक्षक चांगल्या प्रकारे मुलांना शिकवू शकतात व दर्जेदार शिक्षण मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला.
तसेच शिक्षकाने सुद्धा स्वतःचा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असे विचार या मनोगतातून प्राध्यापक खानोलकर यांनी मांडत आपला जो माजी विद्यार्थी म्हणून मानसन्मान केला याबद्दल ऋण व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर, , सुनिल घाग आबु मेस्त्री,सचिन परब तसेच ग्रामपंचायत सदस्य, विनोद भोई सर,विलास सावंत, सुनिल सावंत, दिगंबर आरेकर आणि मान्यवर उपस्थित होते.













