संगीत प्रसारासाठी कार्यरत विजय म्युजिक अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीची १६ वर्षे पूर्ण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे; संगीत विशारद अक्षय साळुंके यांचा स्तुत्य उपक्रम

मंडणगड (प्रतिनिधी)  : शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीतकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे, या उद्देशाने संगीत शिक्षक अक्षय साळुंके यांनी २०१० मध्ये सुरू केलेल्या विजय म्युजिक अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीला यंदा दसऱ्याच्या दिवशी १६ वर्षे पूर्ण झाली. गेल्या सोळा वर्षांपासून अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध संगीत वाद्यांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
विजय म्युजिक अकॅडमीमुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील महाड, गोरेगाव, मंडणगड, श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातच संगीत वाद्यांच्या वादनाचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि प्रशिक्षण मिळत आहे. शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबरोबरच अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकसंगीत, काळानुरूप बदलणारे बॉलीवूड संगीत आणि पाश्चात्त्य संगीताचीही ओळख करून दिली जाते.
विद्यार्थ्यांनाविनामुल्य संगीत प्रशिक्षण
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगीतकलेचे शिक्षण मिळावे, यासाठी अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. संगीत शिकण्याची आवड आणि प्रतिभा असलेला कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे संगीत शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने दरवर्षी काही विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.
अकॅडमीमध्ये आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांनी तबला, मृदंग, ढोलकी आणि हार्मोनियम या वाद्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देण्याचे काम अकॅडमीचे संस्थापक व संगीत विशारद अक्षय साळुंके यांनी केले आहे. या प्रशिक्षणातून तयार झालेले विद्यार्थी आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तबला, हार्मोनियम, पखवाज आणि ढोलकी वादनातून आपली कला सादर करीत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळावी, यासाठी अकॅडमीने गेल्या सोळा वर्षांत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही संगीत शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संगीत विद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
संगीत क्षेत्रातील अनुभवाचा विद्यार्थ्यांना लाभ
संगीत शिक्षक अक्षय साळुंके हे स्वतः एक प्रथितयश वादक कलाकार आहेत. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांचे कार्यक्रम तसेच शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या कार्यक्रमांमध्ये ते ढोलकी, ढोलक, तबला, काँगो आणि ऑक्टो पॅड या वाद्यांची साथसंगत करतात.
लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर तसेच हास्यजत्रेतील संगीत संयोजक अमेय हडकर यांच्यासोबतही त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. विविध संगीत कार्यक्रमांमधील अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागात कलेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मर्यादित संधी उपलब्ध असतानाही अक्षय साळुंके यांनी याच क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तबला या वाद्यामध्ये संगीत विशारद पदवी संपादन केली. त्याचबरोबर ढोलकी, ढोलक, पॅड, सिंथेसायझर आणि संवादिनी यांसारख्या वाद्यांचे ज्ञानही संपादन केले. स्वतः मिळविलेले हे ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी विजय म्युजिक अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
ग्रामीण भागातील कलागुणांना मिळाले व्यासपीठ
ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांमध्ये संगीतकलेची सुप्त प्रतिभा असते; मात्र योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे या कलागुणांना पुरेसा वाव मिळत नाही. विजय म्युजिक अकॅडमीने अशा विद्यार्थ्यांना संगीत वादनाचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
संगीत शिक्षण, वाद्यांचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष सादरीकरणाचा अनुभव आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण अशा विविध उपक्रमांतून अकॅडमीने आपली सोळा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्याची दिशा देणारा हा उपक्रम मंडणगड तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.