सिंधुदुर्गनगरीतील शिवपुतळा, प्रवेशद्वार, मार्केट विकास होणार!

सिंधुदुर्ग– मालवण रस्त्याच्या विकासाला गती!

आमदार नीलेश राणे यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्गनगरीच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार! 

शिवसेना नेते काका कुडाळकर यांचा विश्वास. 

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची २ कोटी खर्च करून उभारणी, ८ कोटी प्रवेशद्वार शोभीकरणासाठी, ९ कोटी मार्केटच्या विकासासाठी तर मालवण-कसाल रस्त्याच्या कामाला एशियन डेव्हलपमेंट मार्फत ३०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नीलेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, कुडाळ पाठोपाठ आता सिंधुदुर्गनगरी विकासाकडे झेप घेईल असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संघटक काका कुडाळकर यांनी व्यक्त केला.

      या पत्रकार परिषदेला, ओरोस गावचे उपसरपंच पांडू मालवणकर, नागेश ओरोसकर, प्रशांत राणे, विलास हडकर, अर्जुन आंबडोस्कर, किशोर पिंगुळकर, प्रकाश देसाई, निलेश परब आधी शिवसेना कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.

               सिंधुदुर्गनगरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश राणे यांनी विशेष लक्ष घातले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी, पुतळ्याचे काम करणारे तज्ज्ञ, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक, वास्तुविशारद आणि अभियंत्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्ग नगरी विकासासाठी पाठबळ दिले असून या विकासासाठी निधी उपलब्ध करून तिला आहे त्याबद्दल काका कुडाळकर यांनी कौतुक केले.

          या पुतळ्यासाठी सिंधू रत्न योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. पुतळ्याची उंची आणि रचना अशा पद्धतीने निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे की, महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्पष्टपणे दिसावा. परिसरातील तटबंदी, पुतळ्याची उंची आणि एकूण रचनात्मक मांडणी यांचा विचार करून हा प्रकल्प साकारण्याचे नियोजन आहे.

        पुतळ्याच्या उभारणीबरोबरच त्याच्या परिसराचा विकास शिवसृष्टीच्या संकल्पनेनुसार व्हावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यासाठी आवश्यक डिझाइन, तांत्रिक बाबी आणि परवानग्या पूर्ण करून कामाला गती देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. एका वर्षाच्या आत पुतळा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याने हा प्रकल्प सिंधुदुर्गनगरीच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

               सिंधुदुर्गनगरी ही केवळ प्रशासकीय कामकाजाचे केंद्र न राहता भविष्यात विकसित शहर म्हणून ओळखली जावी, या दृष्टीने आमदार नीलेश राणे प्रयत्न करत आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते, प्रवेशद्वार आणि सार्वजनिक परिसर यांचे सुशोभीकरण करताना शहराची ओळख ठळकपणे अधोरेखित करण्याची गरज आहे.

           सिंधुदुर्गनगरीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे स्वागत करणारा आकर्षक स्वागतफलक, रस्त्यांच्या परिसरातील आवश्यक सुविधा आणि सार्वजनिक जागांचा नियोजनबद्ध विकास या बाबींनाही प्राधान्य देण्यात येत आहे. शहराच्या विकासाचा विचार करताना केवळ एखाद्या प्रकल्पापुरते मर्यादित न राहता भविष्यातील वाढत्या नागरी गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यावर भर दिला जात आहे.

           सिंधुदुर्गनगरीच्या भविष्यातील नगरपंचायत स्वरूपातील विकासाच्या दृष्टीनेही पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ते, पाणी, सार्वजनिक सुविधा आणि नागरी विकास यांचा समन्वय साधून कामे होणे गरजेचे आहे. या सर्व बाबींकडे आमदार नीलेश राणे स्वतः लक्ष देत असल्याचे काका कुडाळकर यांनी नमूद केले.

       सिंधुदुर्गनगरीच्या विकासामध्ये मार्केटचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात शासकीय कामांसाठी दररोज अनेक नागरिक येत असतात. त्याचबरोबर परिसरातील व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध बाजारपेठ असणे आवश्यक आहे.मार्केटचा विकास करताना व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी योग्य सुविधा, नागरिकांना खरेदीसाठी सोयीस्कर वातावरण, वाहतुकीचे नियोजन आणि परिसराची स्वच्छता या बाबींचा विचार होणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गनगरीचा भविष्यात विस्तार होणार असल्याने बाजारपेठेचे नियोजनही त्या दृष्टीने करणे गरजेचे आहे.

        सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मालवण-कसाल रस्त्याचे महत्त्व मोठे आहे. मालवण हे पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवलेले शहर असून, सिंधुदुर्ग किल्ला, समुद्रकिनारे आणि परिसरातील पर्यटनस्थळांमुळे येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटन क्षेत्राला जिल्हा मुख्यालयाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी रस्त्याची सुधारणा महत्त्वाची ठरणार आहे.या रस्त्याच्या विकासासाठी सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करून त्यातील तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या आहेत. रस्त्याच्या विविध टप्प्यांवर उपलब्ध जागा आणि स्थानिक परिस्थितीनुसार रुंदीचे नियोजन करण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणासह दर्जेदार रस्त्याची उभारणी करण्याचे नियोजन आहे.

मालवण-कसाल मार्ग अधिक सक्षम झाल्यास पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुलभ होईल. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांनाही त्याचा फायदा होईल. रस्त्याच्या कडेला आवश्यक सुविधा, सुरक्षित वाहतूक आणि परिसरातील सार्वजनिक सोयींचा विचार केल्यास या प्रकल्पाचा लाभ अधिक व्यापक होऊ शकतो.

हा रस्ता केवळ मालवणला जोडणारा मार्ग नसून, सिंधुदुर्गनगरीच्या विकासालाही चालना देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पर्यटन, व्यापार आणि प्रशासकीय संपर्क अधिक मजबूत झाल्यास जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांनाही गती मिळण्यास मदत होईल.

विकासाच्या अनुशेषाची भरपाई करण्याचा निर्धार

सिंधुदुर्गनगरीला जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून अपेक्षित असलेल्या सुविधा आणि विकसित शहराचे स्वरूप मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील दहा वर्षांत या मतदारसंघाला विकासापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप काका कुडाळकर यांनी केला. या काळातील अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार नीलेश राणे अहोरात्र मेहनत घेत असून, विविध विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

शिवपुतळ्याची उभारणी, परिसराचे सुशोभीकरण, मार्केटचा विकास आणि मालवण-कसाल रस्त्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्यामागे सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास साधण्याची भूमिका आहे. या कामांसाठी संबंधित शासकीय विभाग, अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधून प्रकल्प वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.

           आमदार नीलेश राणे यांचे विधिमंडळातील काम आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न यांचा आगामी काळात निश्चितच फायदा होईल. सिंधुदुर्गनगरीला विकसित शहराचे स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच संपूर्ण परिसराच्या विकासालाही गती मिळेल, असा विश्वास काका कुडाळकर यांनी व्यक्त केला.