धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
रील स्पर्धा, फुलाफळांची आरास आणि विद्युत रोषणाई ठरली आकर्षण
चिपळूण (प्रतिनिधी) : भक्तीमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फुलाफळांची आकर्षक सजावट आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थानचा नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाला महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळ व पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा आणि तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. नवरात्रोत्सवात विधिवत घटस्थापना, अभिषेक, पूजा-अर्चा, चंडीपाठ, नवचंडी याग, हरिपाठ, संगीत भजन, रासगरबा, जाखडी नृत्य आणि हळदीकुंकू अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अष्टमीला पारंपरिक विधीनंतर मानकऱ्यांच्या हस्ते प्रतीकात्मक बळी देण्यात आला. रात्री ढोल-ताशांच्या गजरात देवीच्या पालखीचा छबिना काढण्यात आला. मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, फुलाफळांची सजावट आणि देवींचा नवरंगी साज भाविकांचे विशेष आकर्षण ठरला. सामाजिक बांधिलकी जपत १३ ऑक्टोबर रोजी मंगेश आंब्रे व मिलन आंब्रे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देणाऱ्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले. सौ. ज्योती घाग (दहिवली) व विनायक सुर्वे (कुंभारखाणी) यांनी देवींसमोरील स्टीलचे रेलिंग अर्पण केले. एका भाविकाने चार देवींच्या चरणी सोन्याचे डोळे अर्पण करून नवसपूर्ती केली. टेरवचे सुपुत्र चिराग शैलेशराव मोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य रील स्पर्धेत ४५ ते ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेली मंदिर परिसराची दृश्ये समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने देवस्थानला व्यापक प्रसिद्धी मिळाली. स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना दसऱ्याच्या दिवशी सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अन्य सहभागी स्पर्धकांनाही सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या तरुणांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजद्वारे आकर्षक रील्सच्या माध्यमातून श्री क्षेत्र टेरव देवस्थानच्या नवरात्रोत्सवाची प्रसिद्धी देशातील, परदेशातील तब्बल १५ लाख (१५,००,०००) भाविकांपर्यंत पोहोचवली. तसेच उत्सवाला विविध वृत्तपत्रे व ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने विशेष प्रसिद्धी दिली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी, ग्रामस्थ, माहेरवाशिणी व पर्यटकांनी देवीचे दर्शन घेतले. दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पूजनानंतर सोने लुटण्याची प्रथा पार पाडण्यात आली. नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे कार्यकर्ते, ग्रामस्थ, दानशूर भक्त, रील स्पर्धक, पत्रकार, वृत्तवाहिनी, प्रशासन, पोलीस, महावितरण आणि सर्व हितचिंतकांचे समस्त ग्रामस्थ, टेरव यांच्या वतीने आभार मानण्यात आले.













