सुमारे ४७६ लाभार्थ्यांना शासकीय वाहतुकीसाठी उपयुक्त कार्ड; सामाजिक उपक्रमातून स्वावलंबनाला प्रोत्साहन
म्हापण : प्रतिनिधी
भारत सरकारच्या ‘एक देश एक कार्डच्या’ संकल्पनेअंतर्गत महिला व ज्येष्ठ नागरिकांना शासकीय वाहतुकीचा लाभ सुलभपणे घेता यावा, तसेच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आरंभ प्रतिष्ठानच्या वतीने म्हापण येथिल आनंद गावडे यांच्या इमारतीतील सभागृहात महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी (National Common Mobility Card) कार्ड उपलब्ध करून देण्याचे एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . आरंभ प्रतिष्ठापना वतीने वेग वेगळ्या भागात घेण्यात आलेल्या शिबिरात आतापर्यंत सुमारे ४७६ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली असून काहींना कार्डचे वाटप करण्यात आले.
शासकीय वाहतुकीचा लाभ घेणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना योजनांची माहिती देणे आणि सामाजिक स्तरावर स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमा मागील प्रमुख हेतू होता. आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
या आयोजित शिबिरा प्रसंगी जि.प.सदस्या यज्ञा साळगांवकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर,माजी सरपंच आनंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत,माजी उपसरपंच अशोक पाटकर, आरंभ प्रतिष्ठान अध्यक्ष उत्तम चव्हाण, संचालक सहदेव शिरोडकर, उदय शिरोडकर, गुरुप्रसाद चव्हाण त्याचप्रमाणे हे शिबिर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मानसी चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, प्रदिप गवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले .
आरंभ प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत मातृ वंदना विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, अथर्वशीर्ष पठण प्रवचन, तसेच राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा, जिल्हास्तरीय वृक्षारोपण, पाणी अडवा-पाणी जिरवा बंधारे बांधणे यांसारख्या जलसंधारणाच्या उपक्रमांचा तसेच ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा समाजउपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील महिला (१२वर्षावरील महिला )व ज्येष्ठ नागरिकांनी शासकीय योजनांचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळावे, या सामाजिक हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत शिरोडा,आरवली, म्हापण,बांदा अशा विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करुन सुमारे ४७६ लाभार्थ्यांना या सवलतीच्या दरात कार्ड देवून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारची कार्ड नोंदणी कुठे व कशी करावी यासाठी माहिती मिळण्यात अडचण येतात ही बाब लक्षात घेऊन थेट गावात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.आरंभ प्रतिष्ठापनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांपर्यंत सुविधा पोहोचविण्याचा आरंभ प्रतिष्ठानचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.













