विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर देणगीचा संकल्प पूर्ण
सांगवे-भिरवंडे ग्रामस्थांकडून दातृत्वाचे कौतुक
कणकवली : सांगवे-भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोटया सावंत यांनी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी देणगीचा संकल्प पूर्ण केला. त्यांच्या या दातृत्वाचे सांगवे-भिरवंडे गावातील मानकरी, ग्रामस्थ आणि भाविकांकडून कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी श्री दिर्बादेवी मंदिराच्या वार्षिक उत्सवावेळी संदेश सावंत यांनी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गेल्या वर्षी अडीच लाख रुपये आणि यावर्षी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू होणाऱ्या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने उर्वरित अडीच लाख रुपये अशी एकूण पाच लाख रुपयांची देणगी त्यांनी सांगवे-भिरवंडे गावच्या मानकऱ्यांकडे सुपूर्द केली.
गावच्या ग्रामदैवताच्या मंदिरासाठी दिलेल्या या भरघोस देणगीतून संदेश उर्फ गोटया सावंत यांनी धार्मिक कार्याप्रती असलेली श्रद्धा आणि गावाविषयीची आत्मीयता जपली आहे. त्यांच्या या योगदानामुळे मंदिराच्या धार्मिक व उत्सवविषयक कार्याला हातभार लागणार आहे.
यावेळी प्रमोद सावंत, प्रदीप उर्फ बाळी सावंत, आर. एच. सावंत सर, महेश सावंत, भालचंद्र सावंत, रामकृष्ण सावंत, राजेंद्र उर्फ बाळा सावंत, महेंद्र सावंत, संजय सावंत, संतोष सावंत, शिवाजी सावंत, विलास सावंत, बाळा मेस्त्री यांच्यासह सांगवे-भिरवंडे गावचे ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. संदेश उर्फ गोटया सावंत यांनी दिलेल्या देणगीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.













