कुत्र्याला वाचवण्याच्या नादात रिक्षा पलटी, चालकाचा मृत्यू

देवधे ग्रामपंचायत उपसरपंच संजय मणचेकर यांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ

लांजा (प्रतिनिधी) कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक तथा देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संजय नारायण मणचेकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर धनावडे शेती फार्म त्या ठिकाणी घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवधे येथील रहिवासी असलेल्या संजय मणचेकर (वय ४२) यांचा रिक्षा व्यवसाय असून रिक्षा संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. याशिवाय देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून ते कार्यरत आहेत. संजय
मणचेकर हे आज बुधवारी दुपारी लांजा येथून देवधे येथील आपल्या घरी जेवणासाठी रिक्षा घेऊन चालले होते. त्यांची रिक्षा धनावडे शेती फार्म या ठिकाणी आली असता समोर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात रिक्षा पलटी झाली.
याच दरम्यान पाठीमागून रिक्षा घेऊन येणाऱ्या संजय मणचेकर यांचा चुलत भाऊ प्रकाश जानू मणचेकर याने रिक्षा पलटी झाल्याचे पाहिले. त्यानंतर त्याने आपल्या रिक्षातून संजय मणचेकर यांना लांजा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर तिथून त्यांना ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार साठी दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
संजय मणचेकर यांच्या या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पक्षात दोन मुलगे, पत्नी असा परिवार आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.