बर्वे ग्रंथालयात दिवाळी अंक योजना सुरू

देवगड : प्रतिनिधी : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने वाचकांसाठी दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केवळ १५० रुपये वर्गणी भरून वाचकांना सुमारे ६० नामवंत व दर्जेदार दिवाळी अंक वाचण्याची संधी मिळणार आहे.

 

या योजनेत कथा, कादंबरी, विनोद, ललित साहित्य, ज्योतिष, पर्यटन, आरोग्य, पाककला व मनोरंजन अशा विविध विषयांवरील दिवाळी अंकांचा समावेश आहे. तसेच महिला व बालकांसाठी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांचाही वाचकांना आस्वाद घेता येणार आहे. विविध विषयांतील साहित्य वाचण्याची आवड जोपासणाऱ्या वाचकांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

 

तरी वाचनप्रेमींनी आपली वर्गणी भरून या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर यांनी केले आहे.