चिपळूण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड नितीन सावंत यांची फेरनिवड

ॲड. मनोहर यादव ज्येष्ठ कायदेशीर सल्लागार पदी

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण तालुका वकील संघ (रजि.) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी वकील कक्षामध्ये संपन्न झाली. या सभेत पुढील तीन वर्षांसाठी संघाच्या अध्यक्षपदी ॲड नितीन सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी सौ. नयना पवार यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच संघाच्या ज्येष्ठ कायदेशीर सल्लागारपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड मनोहर यादव यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
दीर्घकाळ रिक्त असलेल्या ज्येष्ठ कायदेशीर सल्लागारपदावर ॲड. मनोहर यादव यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जीवन रेळेकर यांनी मांडला. या प्रस्तावाला ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भाऊ दळी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. संघाच्या घटनेत आवश्यक दुरुस्त्या करणे तसेच संस्थेच्या कामकाजातील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी ॲड. यादव यांच्यावर सोपविण्यात आली. सभेत संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार सचिवपदी ॲड. सतीश रामदास मोरे, खजिनदार पदी ॲड. मिलिंद अरविंद तांबे, तर सहसचिवपदी ॲड. वर्षा सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भाऊ दळी यांनी संघासाठी नवीन इमारत उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच निवडणूक न घेता व्यवस्थापकीय समिती गठित करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर पुढील सदस्यांचा समावेश असलेली व्यवस्थापकीय समिती बहुमताने निश्चित करण्यात आली. व्यवस्थापकीय समिती सदस्यपदी ॲड. संजय श्रीकृष्ण केतकर, ॲड. रोहन विनायक बापट, ॲड.नारायण गणपत लाड, ॲड. संतोष शांताराम आवले, ॲड. आशय विनायक होमकळस, ॲड. जयरत्न भागोजी कदम, ॲड. राजेश्री संजय शिरगावकर, ॲड. शशिकांत दिनकर पिरदनकर, ॲड. चिन्मय सुबोध दीक्षित, ॲड. स्नेहल नंदकुमार मोहिते, ॲड . मृणाल विशाल खेराडे आणि ॲड. शाम चंद्रकांत नार्वेकर. ज्येष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. मनोहर सीताराम यादव यांचाही समितीत समावेश करण्यात आला. सभेच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष ॲड. नितीन सावंत यांनी संघाची नवीन इमारत लवकरात लवकर उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थितांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले. उपाध्यक्ष सौ. नयना पवार यांनी आभार प्रदर्शन केले आणि सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.