ओणी येथे २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान बालकुमार साहित्य संमेलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमालेचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा राजापूर यांच्या वतीने सोमवार २३ नोव्हेंबर ते शनिवार २८ नोव्हेंबर या कालावधीत ‘ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलन’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथे होणार आहे. सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० ते ९:३० या वेळेत सुप्रभा वाचनालय कोंडिवळे ते नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी अशी भव्य ‘पुस्तक दिंडी’ काढण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी उद्घाटक म्हणून जि. प. शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे उपस्थित राहणार आहेत. तर संमेलनाचे अध्यक्षस्थान कणकवली येथील सुप्रसिध्द कवी अजय कांडर भूषविणार आहेत. स्वागताध्यक्षपद को.म.सा.प. शाखा, राजापूरचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर भूषविणार आहेत. यावेळी अध्यक्ष, को.म.सा.प.च्या अध्यक्षा सौ. नमिता कीर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दुपारच्या सत्रात लेखक आपल्या भेटीला यामध्ये बाल साहित्यिक मदन हजेरी यांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतकार म्हणून प्राचार्य डॉ. राजाराम राठोड आणि सौ. मुग्धा कुळये काम पाहतील.
दुपारी २ ते ४:१५ या वेळात निवडक १५ शालेय मुलांचे ‘कविसंमेलन’ रंगणार आहे. सायंकाळी ३:३० ते ४:१५ या वेळेत समारोप भाषण व संमेलनाध्यक्ष अजय कांडर यांच्या मार्गदर्शनाने संमेलनाची सांगता होईल.
बुधवार दि. २५ नोव्हेंबर ते शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ या काळात दररोज वैचारिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले विचार पुष्प बुधवार, २५ नोव्हेंबर, सकाळी ११:०० ते दु. १२:३०, विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीसाठीचे कार्य या विषयी वक्त्या प्रमिता तांबे (कवयित्री, कणकवली) विचार मांडणार आहेत.
दुसरे विचार पुष्प गुरुवार, २६ नोव्हेंबर, सकाळी ११:०० ते दु. १२:३० या वेळात विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना या विषयावर वक्ते अजय कांडर (सुप्रसिद्ध कवी, कणकवली) हे विचार मांडतील तर तिसरे विचार पुष्प शुक्रवार, २७ नोव्हेंबर, सकाळी ११:०० ते दु. १२:३० यावेळेत विषय: मराठी कवितेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन याविषयी वक्ते: डॉ. शिवराज गोपाळे (रत्नागिरी) व्याख्यान देतील तर चौथे विचार पुष्प शनिवार, २८ नोव्हेंबर, सकाळी ९:०० ते १०:३० या वेळात विषय: संविधानाचे महत्त्व वक्ते राष्ट्रपाल सावंत (चिपळूण) आपले विचार मांडणार आहेत.
या वाङ्मयीन आणि वैचारिक सोहळ्याला ओणी पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील तमाम रसिक, वाचक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन संस्था सचिव ॲड. गुरुदत्त खानविलकर, कार्याध्यक्ष प्रदीप मुख्याध्यापक विनोद मिरगुले, सूर्यकांत सुतार, सौ. साक्षी शिंदे यांनी केले आहे.