जलसंधारणाचा कुमामे रोपवाटिकेचा आदर्श वस्तुपाठ!      

▪️दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करत कुमामे रोपवाटिकेत बांधला कच्चा बंधारा          

▪️रोपवाटिकेतील ५० हजार कलमांना मिळाले अभयदान!      

 ▪️विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ

मसुरे | झुंजार पेडणेकर :चालू वर्षी ‘एल निनो’चा प्रभाव आणि त्यामुळे उद्भवलेली दुष्काळसदृश परिस्थिती यावर मात करण्यासाठी लोक सहभागातून व शासकीय पातळीवर जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मालवण तालुका फळ रोपवाटिका कुमामे येथे उपकृषी अधिकारी श्री. सुनील कदम यांच्या विशेष पुढाकारातून आणि लोकसहभागातून एक अत्यंत स्तुत्य जलसंधारण उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. शासकीय रोपवाटिका प्रक्षेत्रावर कच्चा बंधारा बांधून मोठ्या प्रमाणावर पाणी अडवण्यात यश आले असून परिसरातील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

▪️पाचशे मीटरचा पाट काढून विहिरीचे पुनर्भरण-

या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कच्च्या बंधाऱ्यामुळे बंधाऱ्याच्या वरील बाजूस तब्बल १ किलोमीटरपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. केवळ पाणी अडवून न थांबता, या साठवलेल्या पाण्याला ५०० मीटर लांबीचा पाट काढून वळवण्यात आले असून, रोपवाटिकेतील मुख्य विहिरीचे यशस्वी पुनर्भरण करण्यात आले आहे.

▪️आसपासच्या विहिरिंच्या भूजल पातळीत वाढ-

या जलसंधारणाच्या उपक्रमामुळे कुमामे रोपवाटिका प्रक्षेत्रातील तसेच लगतच्या परिसरातील विहिरीच्या भूजल पातळीत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे. भीषण उन्हाळ्यातही या भागातील पाण्याचा स्रोत टिकून राहण्यासाठी हा बंधारा मैलाचा दगड ठरणार आहे.

▪️५० हजार रोपे आणि कलमांचे रक्षण- कुमामे येथील या शासकीय फळ रोपवाटिकेमध्ये सद्यस्थितीत विविध फळझाडांची व मसाल्याच्या पिकांची सुमारे ५० हजार रोपे व कलमे तयार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंबा कलमे, काजू कलमे, नारळ, सुपारी, कोकम तसेच मसाला पिके:दालचिनी, काळी मिरी इत्यादी रोपे तयार आहेत.

उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे या मौल्यवान कलमांना आणि रोपांना मोठा धोका निर्माण झाला असता. मात्र, वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे आणि अडवलेल्या मुबलक पाण्यामुळे ५० हजार रोपांच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटला आहे.

उपकृषी अधिकारी श्री. सुनील कदम , श्री दशरथ सावंत, सहाय्यक कृषी अधिकारी नितेश पाताडे आणि त्यांच्या पथकाने लोकसहभागातून राबवलेल्या या धडक कृतीमुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच स्थानिक शेतकऱ्यांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि उन्हाळ्यातील टंचाईवर लोकसहभागाने कशी मात करता येते, याचा एक वस्तुपाठच कुमामे रोपवाटिकेने घालून दिला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यानी बंधारा स्थळी भेत देत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.