पाली : महाराष्ट्र कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असताना ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी समाजाला त्याची मोठ्या प्रमाणावर झड सोसावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व विद्यापीठांना निर्देश देण्यात आले की महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयाच्या परीक्षेची फी विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी. त्यानुसार सर्व विद्यापीठांकडून महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले. त्याचीच अंमलबजावणी म्हणून डी. जे. सामंत सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पाली, रत्नागिरी या महाविद्यालयाने महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री, डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी त्या-त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एका दिवसामध्ये महाविद्यालयातून ऑनलाइन पाठविण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी मुलांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री मा. डॉ. उदय सामंत यांच्या कल्पनेतून पंचवीस वर्षांपूर्वी श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या अंतर्गत डी. जे. सामंत सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पाली, महाविद्यालय तसेच आय.टी.आय. व इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यात आली. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात जाण्यासाठी होणारा त्रास व आर्थिक भूदंड कमी व्हावा, त्याचबरोबर चांगल्या प्रतीचे शिक्षण गावातच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली.
दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पालकांना आर्थिक चणचण भासत असतानाही आपल्या मुलाचे भवितव्य उज्वल व्हावे या उद्देशाने त्यांनी फी भरली. परंतु रत्नागिरी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात झाल्यामुळे तालुक्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्देश मुंबई विद्यापीठांकडून देण्यात आले. त्यानुसार डी. जे. सामंत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची फी परत करण्यात आली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.













