१७ वर्षांखालील मुलांच्या गोळाफेक प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक
दोडामार्ग, :प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत साटेली भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी गोविंद संजय नाईक याने चमकदार कामगिरी केली आहे.
१७ वर्षांखालील मुलांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारात गोविंदने सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे त्याची डेरवण (चिपळूण) येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गोविंद हा गेल्या तीन वर्षांपासून या क्रीडा प्रकारात कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सराव करत आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशात शाळेचे क्रीडा शिक्षक प्रवीण केसस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गोविंदच्या या यशामुळे करुणा सदन स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्याच्या या विशेष यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्रिस्टिना, उपमुख्याध्यापिका सिस्टर दिप्ती आणि मॅनेजर सिस्टर मॉली यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













