ड्युटीवर जाताना होमगार्ड सचिन कडू यांचा अपघात; बोरघर घोलपवाडी येथे दुचाकी घसरली, पुढील उपचारांसाठी डेरवणला हलविले

खेड (प्रतिनिधी) : गुरुवारी सायंकाळी ड्युटीवर जात असताना बोरघर घोलपवाडी येथील पिनाक हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात खेड तालुक्यातील चिंचघर येथील सचिन हरिद्र कडू (वय ५०) हे होमगार्ड जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजून ७ मिनिटांनी बोरघर घोलपवाडी परिसरातील पिनाक हॉटेलजवळ हा अपघात घडला. सचिन कडू हे एमएच ०८ बीडी ५१७० क्रमांकाच्या दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच जय हिंद ॲम्ब्युलन्स ने मदतीने जखमी सचिन कडू यांना तातडीने कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
कर्तव्यावर जात असताना होमगार्डचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. सचिन कडू यांच्या प्रकृतीबाबत तसेच अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या अपघाताची नोंद खेड पोलीस स्थानकात झाली असून याचा पुढील तपास खेळ पोलीस करत आहेत.