खेड BREAKING: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दरड; धामणदेवीजवळ मुंबईकडे जाणारी लेन बंद

खेड । राकेश कोळी :

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्यापासून पुढे धामणदेवी गावाजवळ आज पहाटे मोठी दरड कोसळली आहे. या घटनेमुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली असून उर्वरित मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दरड तातडीने हटवून वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने वाहनचालकांनी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.