खेर्डी बाजारपेठेत हायवेच्या पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना नाहक त्रास

 बांधकाम खाते, ठेकेदाराने दाखल घ्यावी- अशोक पवार
चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी बाजारपेठेत पहिल्याच पावसाने महामार्गांवर दाणादाण उडाली असून चिपळूण – कराड मार्गावर पाणी साचल्याने व्यापाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय झाली. वेळीच याबाबत उपाययोजना झाली नाही तर आपण नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी दिला आहे.
पहिल्याच पावसाने महामार्ग अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचे बिंग फुटले. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणी गटारात न जाता रस्त्यावर येते, त्यामुळे अर्धा अधिक रस्ता पाण्याखाली जात असल्याने दुकानात जाता येत नाही. घाणेरड्या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते. व्यापारी तसेच नागरिक यामुळे त्रस्त आहेत. महामार्गचे काम करताना महामार्ग खात्याचे अधिकारी व ठेकेदार कंपनी यांनी योग्य काम न कल्याने रस्त्यावर नदी वाहते. यामुळे वाहन चालक, प्रवासी, पादचारी यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडते. यातून अपघातही होतात. याबाबत आम्ही ग्रामपंचायतीलाही कळवले आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याचे शाखा अभियंता श्याम खुणेकर यांनाही याबाबत सांगितले असून त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. वेळीच काम केले नाही तर या पावसाळ्यात नागरिकांसह रस्त्यावर उतरू असा इशारा अशोक पवार यांनी दिला आहे.