वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन आवश्यक

रत्नागिरी, : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विकसित भारताच्या दिशेने युवाशक्तीच्या प्रेरणेसाठी सेवा संकल्प अभियान अंतर्गत वन्यजीव-मानव संघर्ष व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख वक्त्या म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक आरती खेडेकर व वनरक्षक काजल शुक्ल उपस्थित होत्या. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका संजना तारी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वनरक्षक आरती खेडेकर यांनी वन्यजीव-मानव संघर्षाची कारणे व त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. जंगलातील अधिवासाचा ऱ्हास आणि अन्नाची कमतरता यांमुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले. हा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांचे संरक्षण, वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन आणि मानवाने निसर्गाशी सुसंवाद राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे पाणीटंचाई, जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी आणि वन्यजीवांना निर्माण होणारे धोके यांसारख्या समस्या वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. उघड्यावर कचरा टाकणे टाळणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रशालेचे इको क्लब शिक्षक धनाजी वाघमोडे यांनी केले.