देवरूख कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे विघ्रवली गावात बंधारे निर्मिती

देवरूख (प्रतिनिधी)

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस (+२स्तर ) विभागातर्फे विघ्रवली गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून बंधारे निर्मिती उपक्रम संपन्न झाला. कनिष्ठ महाविद्यालयातील ४५ स्वयंसेवकांनी या कार्यात सहभाग घेतला होता. दुष्काळजन्य पार्श्वभूमीचा विचार करून जलसंवर्धन व जलसंधारणासाठी कनिष्ठ महाविद्यालय व विघ्रवली ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बंधारे निर्मिती कामासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्याने सुमारे ५० मीटर x १५ मीटर लांबीचे दोन बंधारे बांधण्यात आले. याप्रसंगी विघ्रवली ग्रामपंचायत प्रशासिका सौ. रावणंग, पोलीस पाटील वसंत इंदुलकर, ग्राम विकास अधिकारी सोनल कुंभार, शंकर धामणे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. महिला ग्रामस्थांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एनएसएस विभागातील डॉ. मयुरेश राणे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत व सर्व पदाधिकारी, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या चेअरमन सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.