२९ रोजी “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” कार्यक्रम…
सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिरात सिंधुदुर्गात प्रथमच भाविकांना कायमस्वरूपी दर्शनासाठी दुर्मिळ मानली जाणारी “रामसेतू शिला” उपलब्ध होणार आहे. या रामशिलेचे लोकार्पण गुरुवार, २९ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयोजित आरतीमध्ये राणे सहभागी होणार असून, मंदिर उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा व दात्यांचा सन्मानही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्वामीभक्त अमोल टेंबकर यांनी आपले पूज्य आई-वडील सौ. मंदा मंगेश टेंबकर यांच्या स्मरणार्थ ही रामशिला मंदिराला अर्पण केली आहे.
रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर जाण्यासाठी सागरावर बांधलेल्या ऐतिहासिक रामसेतूचा एक भाग मानला जातो.
वानरसेनेने अत्यंत भक्तीभावाने या दगडांवर ‘श्रीराम’ नाव लिहिताच हे जड पाषाण समुद्राच्या पाण्यावर सहज तरंगू लागले होते.
रामेश्वरमच्या समुद्रात आढळणारा हा पाषाण आजही पाण्यावर तरंगतो, हे त्याचे सर्वात मोठे अलौकिक वैशिष्ट्य आहे.
या पाषाणाचे दर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाची आणि ईश्वरी शक्तीची अनुभूती घेणे होय
या रामशिलेचे दर्शन घेण्याची आणि तिला स्पर्श करून अनुभवण्याची संधी आता मंदिरात येणाऱ्या भाविकांना कायमस्वरूपी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या रामशिळेचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












