सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांचे आवाहन
देवरूख (प्रतिनिधी)
यंदा भीषण दुष्काळाला सामोरे जात असताना पाण्याचे महत्त्व ओळखून दिवाळीच्या सणात पाणी नियोजनाला प्राधान्य द्यावे. तसेच फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण, आगीच्या घटना व अपघात टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, हा आनंद साजरा करताना पर्यावरणाचे आणि समाजाचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फटाके वाजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. परंतु, फटाके वाजवून नेमके काय साध्य होते, असा प्रश्न उपस्थित करत या पैशांचा उपयोग समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी करता येऊ शकतो, असे आर्ते यांनी म्हटले आहे. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण वाढते. फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका असतो. तसेच अपघात होऊन नागरिक जखमी होण्याच्या घटना घडू शकतात. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होतो. याशिवाय फटाक्यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज बनली आहे.
फटाके न वाजविल्यामुळे वाचणाऱ्या पैशांचा उपयोग विविध विधायक कामांसाठी करता येईल. या पैशांतून गरजू व्यक्तींना मदत करणे, अन्नदान करणे, सामाजिक उपक्रम राबविणे तसेच पर्यटनाच्या माध्यमातून आनंद मिळविणे असे पर्याय निवडता येतील. स्वतः आनंद साजरा करताना इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण करणे, हाच दिवाळीचा खरा संदेश असल्याचे आर्ते यांनी नमूद केले. इतरांच्या आनंदात सहभागी होऊया आणि इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेऊया,” या भावनेतून प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. विशेषतः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. फटाक्यांवर पैसे जाळण्यापेक्षा त्या पैशांतून गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया! पाण्याचे महत्त्व जपूया आणि यंदाची दिवाळी सामाजिक बांधिलकी जपत साजरी करूया! असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.
*संपर्क : युयुत्सु आर्ते, सामाजिक कार्यकर्ते, देवरुख*
*मोबाईल : 9422351926 / 7798745498*












