सावंतवाडीतील ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या खर्चावर उपनगराध्यक्षांचे प्रश्नचिन्ह

ऑडिटरच्या उपस्थितीतच कामाचे उत्तर देण्याची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या २८ कोटी रुपयांच्या खर्चाबाबत आणि उर्वरित निधीच्या नियोजनाबाबत सीओईपी आणि पीएमसीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत २८ कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले असून, त्याचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्याची जबाबदारी आमची असल्याचे ॲड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या विशेष सभेत ‘थर्ड पार्टी ऑडिट’चे सादरीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस ऑडिटरच अनुपस्थित राहिल्याने शंका उपस्थित होत आहेत. दोन ऑडिट रिपोर्ट दिले गेले असले तरी आमच्या शंकाकुशंकांचे निरसन करण्यासाठी ऑडिटरने स्वतः सभागृहात उपस्थित राहून उत्तरे देणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे आवश्यक होते, असे त्यांनी नमूद केले. ही योजना आम्हाला थांबवायची नसून केवळ पारदर्शकता हवी आहे, असे सांगत जोपर्यंत ऑडिटर स्वतः येऊन स्पॉट व्हिजिट करत कामाची खातरजमा करत नाहीत आणि खोदलेले रस्ते सुस्थितीत आणले जात नाहीत, तोवर पुढील काम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

प्रशासकीय काळात या योजनेची वर्क ऑर्डर देण्यात आली असून जानेवारी महिन्यात भाजप सत्तेत आल्यानंतर प्रत्यक्षात कामाची अंमलबजावणी सुरू झाली. या कामात काही त्रुटी असल्याच्या तक्रारी नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे यांनी दिल्या होत्या, ज्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, सीओईपी आणि पीएमसीला या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी रुपयांचे मानधन दिले जाणार असून, त्यांचे प्रतिनिधी डॉ. हेडाव यांनी स्वतः उपस्थित राहून अहवाल सादर करणे अपेक्षित होते. कराराप्रमाणे २५ लाखांवरील बिलांनुसार १० ऑडिट होणे गरजेचे असताना, पाच बिलांचे मिळून एकच अशा पद्धतीने ऑडिट केल्याने त्याबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. तसेच पाईप टाकल्यानंतर करारनाम्याप्रमाणे कोटिंग आणि खडीकरण झाले आहे का, याची स्पॉटवर येऊन खात्री करणे गरजेचे असून नियमबाह्य काम झाल्यास भविष्यात नगरपरिषदेवर ताण येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कोल्ड मिक्स कुठे आणि किती भागात झाले याचा स्पष्ट उल्लेख अहवालात असला पाहिजे, असे सांगत मुख्याध्याधिकाऱ्यांनी प्रेस घेण्यापेक्षा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उत्तरे द्यावीत, असे ॲड. निरवडेकर म्हणाले. काम बंद पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नसून ऑडिटरने सभागृहात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यास आणि शंकांचे निरसन झाल्यास सावंतवाडीच्या जनतेसाठी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण जबाबदारी घेऊ, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.