मनसेच्या दणक्याने गुहागर कीर्तनवाडीतील रखडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर…!

वर्षभरापासून पाईपलाइन तयार, मात्र पाणीपुरवठा सुरु होण्याची प्रतीक्षा; मनसेचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन

गुहागर प्रतिनिधी:
शहरातील कीर्तनवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर (ठोंबरे विभाग) ते प्रवीण साटले यांच्या घरापर्यंत पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली नवीन पाइपलाइन गेल्या जवळपास वर्षभरापासून सुरू न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित पाइपलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होऊन जवळपास वर्ष उलटले, तरी अद्याप
पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काम पूर्ण होऊनही नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याने या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, या प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
संबंधित पाइपलाइनची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी आणि पाणीपुरवठा कोणताही विलंब न करता सुरू करावा, अशी आग्रही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. तसेच, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयात त्वरित हस्तक्षेप
करावा, असेही निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर आणि गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर उपस्थित होते.
या निवेदनाची नगरपंचायत प्रशासन कितपत दखल घेते आणि कीर्तनवाडीतील नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.