रत्नागिरी तालुक्यातील खालगावमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंबाबत वनविभागाचा मोठा दावा

रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव परिसरात पट्टेरी वाघ दिसून आल्याच्या दाव्यासह काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, याप्रकरणी वनविभागाशी संपर्क साधला असता, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून तयार केले असण्याची दाट शक्यता वर्तवली असून, वनविभागाकडून या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. असे असतानाच, रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथे पट्टेरी वाघ आढळल्याच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कोकणात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याच्या मुद्द्याला वनविभागाने यापूर्वीच दुजोरा दिला होता, ज्यामुळे खालगावमधील कथित दर्शनावर नागरिकांचा पटकन विश्वास बसला. परंतु, व्हायरल झालेली छायाचित्रे खरी नसून ती एआय (AI) जनरेटेड असावीत, असे स्पष्टीकरण विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी दिल्याने नागरिकांमधील भीती आता काहीशी कमी झाली आहे. तरीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागामार्फत केले जात आहे.