कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा!

आ. शेखर निकम यांचे आयटीआय विद्यार्थ्यांना आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी) : “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कामातील कौशल्य, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. नोकरीच्या मागे धावण्याबरोबरच स्वयंरोजगाराची कास धरून स्वतःच्या पायावर उभे रहावे,” असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले. सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे आयोजित स्वागत समारंभ व कौशल्य दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उद्योजक राजेंद्र विनायक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आ. निकम यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, तांत्रिक शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे मार्गदर्शन केले. उद्योजक राजेंद्र सावंत हे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून नवलाई ग्रुप, रत्नागिरीचे मालक आहेत. आपल्या मनोगतात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “एकेकाळी मीही तुमच्यासारखाच याच सभागृहात विद्यार्थी म्हणून बसत होतो. आज याच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहताना आनंद द्विगुणित झाला आहे. माझ्या यशाचे खरे मानकरी सह्याद्रि शिक्षण संस्था आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते, तर कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता माणसाला मोठे बनविते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेचे प्राचार्य उमेश लकेश्री यांनी प्रास्ताविकात बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या कौशल्यात सातत्याने भर घालण्याची गरज व्यक्त केली. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
समारंभात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले, तर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा युगंधरा राजेशिर्के, संचालक चंद्रकांत सुर्वे, सेक्रेटरी महेश महाडिक, मानसिंग महाडिक, गुलाब सुर्वे, मंगेश घाडगे, सार्थक सावंत, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष गोरीवले यांनी केले.