डुगवेचे सरपंच चंद्रकांत तांडकर ‘आदर्श सरपंच’ २०२६ पुरस्काराने सन्मानित

पारदर्शक कारभाराची पोचपावती!

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील डुगवे गावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत रामचंद्र तांडकर यांना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच ‘आदर्श सरपंच सन्मान -२०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकाभिमुख कारभार करणाऱ्या सरपंचांच्या कार्याला उजळणी देण्यासाठी आयोजित या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात तांडकर यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. या सन्मानामुळे डुगवे गावाचे नाव राज्याच्या नकाशावर अभिमानाने झळकले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील डुगवे हे गाव आहे. सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रकांत तांडकर यांनी गावातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले. स्वच्छता अभियान, २४ तास पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गावातील वृद्ध आणि गरजू नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी यांसारखी कामे त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मार्गी लावली. समस्या सोडवण्यासाठी थेट ग्रामस्थांशी संवाद साधणे आणि पारदर्शक कारभार ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच डुगवे गाव आज आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत तांडकर म्हणाले, गावातील दिगवंत महेंद्र धोंडू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांतूनच मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो असे त्यांनी बोलताना सांगितले. ग्रामस्थांनी व्यक्त केलेला विश्वास हेच आपले खरे बळ आहे, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी यापुढेही गावाच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा सन्मान माझा एकट्याचा नसून, तो डुगवे गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा आहे. गावाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे, असे तांडकर यांनी सांगितले.