कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी वाचन आवश्यक                                                                               – डॉ. संगीता घाडगे

 

 

मुंडे महाविद्यालयात डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी

 

मंडणगड(प्रतिनिधी)दि. :येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ.संगीता घाडगे उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी गंथपाल डॉ. दगडू जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत वाचनाचे महत्व थोडक्यात सांगितले.

मार्गदर्शनपर भाषणात डॉ. संगीता घाडगे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची ओळख करून देताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी वाचन आवश्यक आहे, व हेच का भारतीय समाजामध्ये एक वाचक चळवळ निर्माण करण्याचे महान कार्य डॉ.रंगनाथन यांनी केले आहे. त्यांनी ग्रंथालयशास्त्राची शास्त्रशुद्ध पंचसूत्रीची मांडणी केली. ग्रंथालयाच्या ज्ञानवर्गीकरणाची एक अभिनव पद्धतीसुध्दा त्यांनी तयार केली. की, जेणेकरून त्या पध्दतीचा आज देखील अवलंब केला जातो. ग्रंथालयशास्त्र या विषयावर त्यांची सुमारे पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल मद्रास सरकारने त्यांना ‘रावबहाद्दूर’तर भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल’ त्यांना ‘भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक’ म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्मदिन ‘भारतीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, पुस्तक वाचनाचे अनेक फायदे आपणास सांगता येतील. प्रामुख्याने वाचनामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, व्यक्तिमत्व विकास, समय सूचकता, सकारात्मक विचार करण्याची क्षमता, संवाद कौशल्य, योग्य-अयोग समज तसेच आपल्या मेंदूचा विकास अशा अनेक बाबी वाचनामुळे आपल्याला मिळतात. त्याकरिता वाचन किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ.दगडू जगताप, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ.संगीता घाडगे, प्रा. हनुमंत सुतार, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.दगडू जगताप यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.विष्णु जायभाये यांनी मानले.

………………