गुहागर प्रतिनिधी :
भारतीय ज्ञानपरंपरेचा समृद्ध वारसा आणि आधुनिक ज्ञानप्रणाली यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणाऱ्या आधुनिक भारतीय ज्ञानपरंपरा आणि ज्ञानप्रणाली या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत आणि ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सत्राच्या अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक वर्गालाही संदर्भग्रंथ म्हणून अत्यंत उपयोगी ठरणार आहे. अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल मी डॉ. भागवत यांचे अभिनंदन करतो.” असे मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी व्यक्त केले.
वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले. भारतीय ज्ञानपरंपरा आणि ज्ञानप्रणाली या विषयावरील मराठीतील हे पुस्तक असून, इतिहास विषयाच्या आताच्या विद्यार्थ्यांसाठी शिवाय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते विशेष उपयुक्त ठरेल. डॉ .भागवत यांचे पहिले पुस्तक हे इतर सहकाऱ्यांसाठीही आदर्श उपक्रम आहे असे ते म्हणाले.
पुस्तकलेखनामागील प्रेरणांविषयी बोलताना डॉ. भागवत यांनी महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील खेळीमेळीचे वातावरण, सर्वांचे सहकार्य आणि प्रोत्साहन यांचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथांची निर्मिती करणारे प्रा. डॉ. सुभाष खोत यांची सततची प्रेरणा व मार्गदर्शन, तसेच ग्रंथालयात आवश्यक संदर्भसाधने उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव यांनी दाखविलेली तत्परता या पुस्तकाच्या लेखनामागील महत्त्वाच्या प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. वर्गातील विद्यार्थ्यांची नवा विषय शिकण्याची आवड आणि जिज्ञासा यांमुळेही या पुस्तकाच्या निर्मितीला चालना मिळाली, असे मत व्यक्त करून डॉ. भागवत यांनी विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन सहकारी आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे त्याचप्रमाणे ईगल लिप प्रकाशन पुणे यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते त्या सर्वांनी डॉ. भागवत यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.













