रिगल कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान

गुहागर प्रतिनिधी :
रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act, 2012) आणि भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम या महत्त्वपूर्ण विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा. श्री. एस. डी. धारप उपस्थित होते. तसेच तालुका विधी सेवा समिती, गुहागरचे पॅनेल अधिवक्ता मा. श्री. एस. जी. आवेरे, न्यायालयीन कर्मचारी मा. श्री. आर. सी. मोहिते, मा. श्री. आर. डी. शिंदे आणि मा. श्री. आर. ए. रणावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉलेजच्या प्राचार्या मा. सौ. रेश्मा मोरे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे मा. श्री. एस. डी. धारप यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पॅनेल अधिवक्ता मा. श्री. एस. जी. आवेरे आणि न्यायालयीन कर्मचारी मा. श्री. आर. सी. मोहिते, मा. श्री. आर. डी. शिंदे व मा. श्री. आर. ए. रणावरे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यानंतर पॅनेल अधिवक्ता मा. श्री. एस. जी. आवेरे यांनी भ्रष्टाचाराचे सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम, भ्रष्टाचारामुळे समाजाच्या विकासावर होणारे परिणाम आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका व जबाबदारी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर मा. श्री. एस. डी. धारप यांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act, 2012), बालकांचे अधिकार, बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी समाजाची भूमिका यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना आपल्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी आणि सामाजिक प्रश्नांकडे जबाबदारीने पाहण्याची दृष्टी विकसित व्हावी, हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अदिती किल्लेकर यांनी केले. रिगल कॉलेजच्या प्राचार्या मा. सौ. रेश्मा मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक प्रा. सौ. पूजा मोरे आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान मिळण्याबरोबरच सामाजिक जाणीव, कायद्याचा आदर आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देण्यात आला.