सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांचा माजगाव येथील ‘सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळ’ यांच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सावंतवाडी येथील राजवाडा येथे हा गौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले आणि युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले प्रामुख्याने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी, आपला सन्मान केल्याबद्दल सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाचे मनापासून आभार मानले. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, “सावंतवाडी संस्थान सुरुवातीपासूनच सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हा स्नेह आणि आपुलकीचे नाते केवळ कौटुंबिक नसून ते सामाजिक बांधिलकीचे आहे. हा जिव्हाळा यापुढेही असाच वृद्धिंगत ठेवावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सत्कार सोहळ्याला माजगाव येथील सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये अनंत बुधाजी सावंत, सौ. अनिता अनंत सावंत, नारायण उर्फ बापू सावंत, प्रताप सावंत, ॲड. शामराव सावंत, विश्वनाथ उर्फ उमेश सावंत, मेघाजी सावंत, रुद्राजी भालेकर, जनार्दन सावंत, विनोद वामन सावंत, सुनील सावंत, महेश सावंत, मंगेश सावंत, अजय सावंत, नरेश सावंत, विनोद सावंत, प्रमोद सावंत, दत्ताराम मेस्त्री, अनिकेत सावंत यांसह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












