पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या केंद्राला मंजूरी
शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करण्याचे प्रमोद रावराणे यांचे आवाहन
वैभववाडी प्रतिनिधी :
कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रावर शासनाच्या आधारभूत किमतीनुसार प्रतिक्विंटल ५२०५ रुपये दराने नाचणी खरेदी केली जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हे केंद्र सुरु होत आहे. या केंद्राचा जिल्ह्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाचणी पिकाची ई-पीक नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघांचे सचिव सिद्देश रावराणे उपस्थित होते.
रावराणे म्हणाले, वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाचणीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किमतीने नाचणी विक्री करता यावी, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला यश आले असून, नाचणीला प्रतिकिलो ५२ रुपये ५ पैसे दर मिळणार आहे. नाचणी विक्री केल्यानंतर २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या केंद्रावर नाचणी विक्री करता येणार आहे. यासाठी नाचणी व भात पिकाची ई-पीक नोंदणी ११ नोव्हेंबरपर्यंत करणे बंधनकारक आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून वैभववाडी व करूळ येथे भात खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी संघाकडे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आधार कार्ड, फार्मर आयडी, सातबारा उतारा, पीकपाणी नोंद, बँक पासबुक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
शेतकऱ्यांमध्ये भात व नाचणी खरेदीबाबत जनजागृती करण्यासाठी संघाचे सर्व संचालक २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत. यावेळी विकास संस्था व ग्रामपंचायतींना भेट देऊन खरेदी प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. शासनाने भातासाठी प्रतिक्विंटल २४४१ रुपये, तर नाचणीसाठी प्रतिक्विंटल ५२०५ रुपये हमीभाव निश्चित केला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रावराणे यांनी केले.
शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना भात विक्री करू नये. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात रीतसर तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. शासनाची आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय खासगी व्यापाऱ्यांना थेट शेतकऱ्यांकडून भात खरेदी करता येणार नाही. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रमोद रावराणे यांनी दिला.
प्रत्येक हेक्टरसाठी युरियाची एक बॅग
यापुढे प्रत्येक हेक्टरसाठी युरियाची एक बॅग उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधी मागणी नोंदवणे आवश्यक आहे. मागणी केल्यानंतरच युरियाची बॅग उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. तसेच तालुक्यातील १३ सहकारी संस्थांकडे खत खरेदी-विक्रीचे परवाने असून, अन्य संस्थांनाही परवाने मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रावराणे यांनी दिली.













