शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी

धुरी कुटुंबियांना दिला मदतीचा शब्द

बांदा (प्रतिनिधी) :

शेर्ले – दुकानवाडी येथे शनिवार १७ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मे. एकनाथ शंकर धुरी या किराणा दुकानाला भीषण आग लागून सुमारे ८० लाख रुपयांचे किराणा सामान जळून खाक झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. धुरी कुटुंबियांचे झालेले नुकसान पाहून ना. नितेश राणेही स्तब्ध झालेत.

शेर्ले माजी सरपंच उदय धुरी यांनी झालेल्या नुकसानी संदर्भात ना. नितेश राणे यांना माहिती दिली. शासनामार्फत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी धुरी कुटुंबीयांना अभिवचन दिले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या दुर्घटनेत दुकानाचे चार गाळे, आतील चार गोडाऊन खोल्या, किराणा साहित्य, भुसार माल आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्यात. शिवाय दुकानाचा विमा नसल्याने धुरी कुटुंबीयावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, माजी उपसरपंच दीपक नाईक, बांदा माजी शहर अध्यक्ष बाबा काणेकर, युवा मोर्चाचे सिद्धेश कांबळी, अक्षय परब, अजित शेर्लेकर, गौरांग शेर्लेकर, राजेश चव्हाण, युवा सेना तालुकाध्यक्ष प्रशांत जाधव, तात्या पावसकर आदीसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.