जलजीवन मिशनच्या कामांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्याकडून नांदगावात आढावा

सहा योजनांची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण

 तरीही चार योजना अद्याप सुरू नाहीत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांबाबत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी प्रथमच नांदगाव येथे भेट देऊन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.

 

नांदगाव गावामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत एकूण आठ योजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी सहा योजनांची कामे जवळपास ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र, कामे एवढ्या प्रमाणात पूर्ण होऊनही एक-दोन योजना वगळता चार योजना अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. तसेच दोन योजनांची कामे अद्याप बाकी आहेत. या परिस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बासुर यांनी सरपंच रविराज मोरजकर यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली.

 

जलजीवन मिशनच्या कामांची कागदोपत्री प्रगती समाधानकारक दिसत असली, तरी प्रत्यक्षात गावागावांत जाऊन कामांची स्थिती तपासणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नांदगाव येथे भेट देत योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. कागदोपत्री नोंदवलेली प्रगती आणि प्रत्यक्षातील कामांची स्थिती यामधील वस्तुस्थिती तपासण्यावर या पाहणीदरम्यान भर देण्यात आला.

 

यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता श्री. राणे, सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, श्री. गुरसाळे, श्री. घेवडे, अमित सावंत, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत, राजू खोत आदी उपस्थित होते.