११ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी शहरात मच्छी मार्केटमधील मॅजेस्टिक स्टॉल शेजारी मोबाईलच्या माध्यमातून कल्याण नावाचा मटका जुगार चालवणाऱ्या दोघांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ हजार रुपये रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी मच्छी मार्केट येथील मॅजेस्टिक स्टॉल शेजारी ही कारवाई करण्यात आली. साहेबराव प्रकाश भुजबळ (पीसी/६७४, नेमणूक सावंतवाडी पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, देवदत्त मनोहर शेळके (वय ३७, रा. कोलगाव फणसवाडी, सावंतवाडी) आणि शिव शंभू जनार्दन बिनोडकर (रा. शाळा नंबर ४ शेजारी, खासकी लवाडा, तालुका सावंतवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवरून कल्याण नावाचा मटका जुगार घेत असल्याचे कारवाईदरम्यान निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून ११ हजार रुपये रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य जप्त केले. या गुन्ह्याची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी (ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक २२) करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNNS) कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.












