Lanja Breaking : देश स्वातंत्र्यानंतर इतिहासात प्रथमच धावणार लांजा माचाळ बस फेरी

थंड हवेचे ठिकाण माचाळ गावात अखेर एसटी बस सेवा होणार सुरू

संतोष कोत्रे
लांजा : तालुक्यातील मिनी महाबळेश्वर अर्थात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ गावामध्ये देश स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस सुरू होत आहे. रविवारी १ नोव्हेंबर रोजी गावात पहिल्यांदाच एसटी बस धावणार असून या बसचे माचाळ गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.
समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेल्या माचाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यावर येथील निसर्गरम्य वातावरण, धबधबे, उलटा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. याबरोबरच उन्हाळी वातावरणामध्ये माचाळ गावातील वातावरण हे आल्हाददायक आणि थंड असते. त्यामुळे माचाळ हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.
या गावांमध्ये जाण्यासाठी पूर्वी केवळ पायवाट होती. मात्र त्यानंतर माचाळ पर्यटन संस्थेचे विवेक सावंत यांच्या प्रयत्नातून आणि लोकांची मागणी लक्षात घेऊन गावामध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या चार ते पाच वर्षात वर्षात माचाळ गावाकडे जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. मात्र अदपही माचाळ गावात जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे माचाळ ग्रामस्थांची देखील मोठी गैरसोय होत होती.
अखेर माचाळ गावचे ग्रामस्थ, आमदार किरण सामंत तसेच लांजा एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे या सर्वांच्या सर्वस्वी प्रयत्नांतून अखेर लांजा माचाळ ही एसटी बस फेरी रविवारी एक नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. या एसटी बाबत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी लांजा बस स्थानकातून सकाळी ८.३० वाजता ही बस माचाळ गावाकडे रवाना होणार असून गावामध्ये आल्यानंतर संपूर्ण गावाच्या वतीने या बस फेरीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. यावेळी आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.