इटली येथे होणाऱ्या ९ व्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
१४ व्या वर्षी ६२ हून अधिक पदकांची कमाई; आ. शेखर निकम यांच्या हस्ते गौरव!
चिपळूण (प्रतिनिधी) : इटली येथे होणाऱ्या ९ व्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कु. आकांक्षा कदम हिचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सावर्डे येथील आमदारांच्या संपर्क कार्यालयात शाल, श्रीफळ आणि फोटो फ्रेम देऊन आकांक्षाचा गौरव करण्यात आला. अवघ्या १४ व्या वर्षी कॅरम खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकांक्षाने आतापर्यंत ६२ हून अधिक पदके पटकावली आहेत. विशेष म्हणजे, मालदीव येथे झालेल्या सहाव्या एशियन कॅरम चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवला आहे. आता इटली येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाल्याने तिच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आकांक्षाने मिळवलेले हे यश रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. यावेळी आ. शेखर निकम यांनी तिचे अभिनंदन करून आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जागतिक स्पर्धेतही आकांक्षा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्कारप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य मंगेश बंडागळे, सागर तांदळे, पंकज पुसाळकर, सचिन साडविलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी आकांक्षाचे अभिनंदन करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या आकांक्षा कदमच्या या यशामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, इटलीतील जागतिक स्पर्धेत तिच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













