दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ८० बॉक्स हस्तगत ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलिसांची धडक कारवाई

अमित खोत | मालवण : मालवण शहरातील दांडी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आलेल्या या छापेमारीत गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ८० बॉक्स हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

मालवण शहरातील दांडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी एकूण ८० बॉक्स दारू जप्त केली असून, या मुद्देमालाची किंमत ५ लाख ३८ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलीस हवालदार सुहास पांचाळ आणि पोलीस हवालदार सुप्रिया पवार यांचा सहभाग होता.

 

मालवण शहरात गोवा बनावटीच्या अवैध दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.