एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ शनिवारी (३१ ऑक्टोबर) रात्री भीषण अपघात घडला. तीव्र वळणाच्या उतारावर भरधाव २२ टायर ट्रेलरने महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथील पोलिसांच्या सरकारी बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो जीप दरीत कोसळली. या अपघातात पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) आणि ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला असून पोलीस कर्मचारी अनिल अशोक शिंगाडे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री अंजनारी घाटातील पुलाखाली नदीपात्रात एक वाहन कोसळून अपघात झाल्याची माहिती लांजा पोलीस ठाण्यातून मिळाली होती. या घटनेची खातरजमा करण्यासाठी महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गायकवाड आणि पोलीस कर्मचारी अनिल शिंगाडे हे सरकारी बोलेरो जीपमधून घटनास्थळी रवाना झाले होते.

दरम्यान, अंजनारी पुलाच्या सुमारे १०० मीटर अलीकडे मागून येणाऱ्या राजस्थान पासिंगच्या २२ टायर ट्रेलरने त्यांच्या बोलेरो जीपला जोरदार धडक दिली. ट्रेलर चालकाने रस्त्याची परिस्थिती आणि तीव्र वळणाच्या उताराचा विचार न करता वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर बोलेरो जीप रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सुमारे ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड यांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या पोलीस कर्मचारी अनिल शिंगाडे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे अतिदक्षता रुग्णवाहिकेतून नेण्यात येत आहे.
दरम्यान, बोलेरो जीपला धडक दिल्यानंतर ट्रेलरही रस्त्याच्या डाव्या बाजूला दरीत कोसळून पलटी झाला. या अपघातात ट्रेलरचा चालक केबिनखाली अडकून गंभीर जखमी झाला. त्यालाही रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र त्याचाही मृत्यू झाला. ट्रेलर चालकाची ओळख आणि पत्ता समजू शकलेला नाही.
अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कदम, लांजा पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक बळवंत पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रेलर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला असून, या घटनेमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळील तीव्र वळण आणि उताराच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.













