खेड (प्रतिनिधी) : महिला बचत गटांनी स्वकर्तृत्वातून तयार केलेल्या विविध वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे शिवतेज आरोग्य संस्था, तीनबत्ती नाका येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी शनिवारी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलवरून विविध वस्तूंची खरेदी करत महिलांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
या प्रदर्शनात खेड तालुक्यातील महिला बचत गटांनी स्वतःच्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून तयार केलेल्या विविध आकर्षक, कलात्मक तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. महिलांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, दीप्ती शिगवण, अंजुम कुरणे, आरती पवार, संजना कुडाळकर, रेश्मा खतीब, वर्षा सापटे, रसिका खेडेकर, नगरसेवक निकेतन पाटणे, तौसीफ खोत, स्वप्निल सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, मिनल चिखले तसेच भाजपचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
शनिवारी दुपारी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रत्येक स्टॉलची पाहणी करत त्यांनी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी बचत गटांच्या स्टॉलवरून खरेदीही केली. महिलांनी घरगुती व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी महिला बचत गटांच्या उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच महिलांनी व्यवसायाची व्याप्ती वाढवून आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन घाडगे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, सभापती आपल्या पालेकर, नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्यासह खेड नगरपरिषदेचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. अशा प्रदर्शनांमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्या उत्पादनांची ओळख निर्माण होते आणि ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते. त्यामुळे या प्रदर्शनाला खेड शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिला बचत गटांकडून वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी केले आहे.
तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. महिलांच्या कष्टातून आणि कल्पकतेतून साकारलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवाला भेट देणे गरजेचे असून, खरेदीच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना बळ देण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे.













