कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

अभिनेते अंकुश चौधरी व दीपा परब यांची प्रमुख उपस्थिती

 २०३० पर्यंत ३० लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा महासंकल्प

मुंबई: गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन साक्षी पोटे, योगिता निजामकर, प्रीती पांगे, सुरज कदम, नयना राणे, साक्षी तुटला आणि सुनीता मर्चंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. ‘आपण कोण? आपण कोकणकर!’ असे आत्मीयतेने म्हणत त्यांनी संस्थेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाची स्तुती केली. ‘मी देखील तुमच्यातलाच एक आहे,’ असे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांचे आभार मानले. त्यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला, तर अभिनेत्री दीपा परब यांनीही यावेळी उपस्थितांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली १८ वर्षे सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाने विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे अधिकृत रजिस्ट्रेशन २०१२ साली झाले असले, तरी सामाजिक कार्याचा हा प्रवास त्याआधीपासूनच अविरत सुरू आहे. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, महिला सक्षमीकरणापासून अनाथ व गरजू मुलांच्या संगोपनापर्यंत संस्थेने आपल्या कार्याचा व्यापक विस्तार केला आहे. आजवर संस्थेच्या माध्यमातून १,२०० मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या जीवनाला आधार देण्याचे काम सुरू आहे. तसेच, दरवर्षी ५,००० हून अधिक स्कूल किटचे वाटप करून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपक्रम, आरोग्यसेवेचे कार्यक्रम आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवले जातात. संस्थेचे प्रत्येक उपक्रम केवळ मदतीपुरते मर्यादित नसून, गरजू व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी आणि आत्मनिर्भर भविष्य देण्याच्या उद्देशाने चालवले जातात.

या वर्धापनदिनाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक दयानंद कुबल यांनी संस्थेच्या आगामी वाटचालीचा एक महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला. त्यानुसार, २०३० पर्यंत तब्बल ३० लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय संस्थेने निश्चित केले आहे. “आपण जे स्वप्न पाहिले आहे, ते केवळ स्वप्न राहणार नाही. योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची साथ, समाजाचा विश्वास आणि सेवाभावाच्या बळावर कोकण संस्था २०३० पर्यंत ३० लाख लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचेल,” असा दृढ विश्वास दयानंद कुबल यांनी यावेळी व्यक्त केला. हा संकल्प केवळ आकड्यांचा नसून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आशेचा प्रकाश पोहोचवण्याचा आहे.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा हा वर्धापनदिन म्हणजे केवळ एका संस्थेच्या स्थापनेचा उत्सव नसून, समाजासाठी झटणाऱ्या शेकडो हातांचा, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव ठरला. ‘समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर संधी निर्माण करता येते आणि एकत्रित प्रयत्नांतून परिवर्तन घडवता येते,’ हा संदेश देत संस्थेने आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर समाजसेवा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.