समाज कल्याण वस्तीगृह आणि फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
रक्तदाब, मधुमेहाच्या चाचण्यांसह मोफत औषधांचे वाटप
चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत सावर्डे येथील समाज कल्याण वस्तीगृह आणि फार्मसी कॉलेजच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी जन आरोग्य समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिरादरम्यान उपस्थित विद्यार्थिनींना ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाचा उद्देश आणि महत्त्व समजावून सांगण्यात आले. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणताही त्रास जाणवल्यास वेळीच वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. पूजा निकम म्हणाल्या की, आपल्या सर्वांचे आरोग्य उत्तम असणे हीच समृद्ध गावाची खरी ओळख आहे. विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासणी, परिसराची स्वच्छता आणि सकस व पौष्टिक आहार यांना प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य चांगले असेल तर शिक्षणातही चांगली प्रगती करता येते. अभ्यासासाठी आवश्यक ऊर्जा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आरोग्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील समुदाय आरोग्य अधिकारी सौ. स्वाती सालवाड यांनी विद्यार्थिनींना कर्करोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कर्करोगाची संभाव्य लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदान आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत त्यांनी माहिती दिली. या शिबिरात विद्यार्थिनींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार इतर तपासण्याही करण्यात आल्या. तसेच विद्यार्थिनींना मोफत औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शनासह प्राथमिक वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली.
या प्रसंगी समाज कल्याण व फार्मसी कॉलेज वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि गृहपाल उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सहाय्यक प्रमोद मा. सावंत, समुदाय आरोग्य अधिकारी स्वाती सालवाड, आरोग्य सेवक निलेश क. छेत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा विलासराव नरवडे, डॉ. दर्शन खोत, लायबा अन्सारी, साक्षी साळुंखे, आशा सेविका निशा नि. दिंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अश्विनी शाळिंभ, मंगेश पवार आदींनी सहकार्य केले. विद्यार्थिनींच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले. निरोगी विद्यार्थी, निरोगी कुटुंब आणि आरोग्यसंपन्न गाव या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम ठरला.













