ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार व ४.२५ लाखांची मदत; संवेदनशील महिला व ग्राहकांच्या दातृत्वामुळे शस्त्रक्रिया यशस्वी
रत्नागिरी :
माणुसकी आणि संवेदनशीलतेचे एक अत्यंत भावुक आणि प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरीत समोर आले आहे. अचानक उद्भवलेल्या हृदयाच्या गंभीर आजारामुळे जीवन-मरणाच्या दारात उभ्या असलेल्या १३ वर्षीय नील घोसाळकर या बालकाच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी ‘रत्नागिरी खबरदार आयोजित दिवाळी शॉपिंग फेस्ट’मधील स्टॉलधारक महिलांनी पुढाकार घेत अवघ्या काही तासांत तब्बल १ लाख ३० हजार ७०० रुपयांचा मदतनिधी उभा केला. या संवेदनशील दातृत्वामुळे आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या तातडीच्या सहकार्यामुळे नीलवर मुंबईतील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
पोळ्या लाटणाऱ्या कष्टकरी मातेवर कोसळले होते आभाळ :
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात राहणारा १३ वर्षीय नील घोसाळकर अचानक उद्भवलेल्या हृदयाच्या गंभीर आजाराने त्रस्त झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याच्यावर अत्यंत तातडीने सर्जरी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे सव्वासहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. घरातून पोळ्या लाटून आणि प्रामाणिक कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या नीलच्या आईवर हा खर्च ऐकून अक्षरशः आभाळच कोसळले होते. इतकी मोठी रक्कम तातडीने कुठून आणायची, या विवंचनेत संपूर्ण घोसाळकर कुटुंब हवालदिल झाले होते.
आपल्यासारख्याच कष्टकरी महिलेची अडचण ओळखून स्टॉलधारक महिला सरसावल्या :
आपल्यासारखीच कष्ट करून प्रपंच चालवणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या निष्पाप लेकरावर ओढवलेले हे संकट जयेश मंगल पार्क येथे सुरू असलेल्या ‘रत्नागिरी खबरदार आयोजित दिवाळी शॉपिंग फेस्ट’मधील महिला व्यावसायिकांना समजले. परिस्थितीचे गांभीर्य आणि एका मातेची वेदना ओळखून प्रदर्शनातील महिला उद्योजिकांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी पुढाकार घेतला. एकापाठोपाठ एक अशा सर्व स्टॉलधारक महिलांनी स्वेच्छेने निधी देण्यास सुरुवात केली. प्रदर्शनात खरेदीसाठी आलेल्या संवेदनशील ग्राहकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या मदतकार्यात हातभार लावला. पाहता पाहता या उपक्रमातून तब्बल १ लाख ३० हजार ७०० रुपयांचा निधी जमा झाला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सव्वाचार लाखांची मदत व विशेष व्यवस्था :
नीलच्या या गंभीर आजाराची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी तत्काळ सूत्रे हलवली. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी नीलला शासकीय योजनेच्या माध्यमातून सुमारे सव्वाचार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. एवढेच नव्हे, तर नीलला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी ना. सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले. सर्वांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे नील घोसाळकर याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, तो आता धोक्याबाहेर आहे.
नीलच्या आजीकडे सुपूर्द केली मदतीची रक्कम :
प्रदर्शनात गोळा झालेली १ लाख ३० हजार ७०० रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जयेश मंगल पार्क येथे आयोजित एका साध्या सोहळ्यात नीलच्या आजीकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली. या संकटसमयी देवदूतासारख्या धावून आलेल्या सर्व स्टॉलधारक भगिनींचे आणि ग्राहकांचे घोसाळकर कुटुंबीयांनी डोळ्यांत आनंदाश्रू आणून मनापासून आभार मानले.
उपस्थित मान्यवर :
मदतनिधी सुपूर्द करताना ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित ओसवाल, नगरसेवक सौरभ मलुष्टे, प्रदर्शनातील सर्व स्टॉलधारक महिला, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणासुदीच्या खरेदी-विक्रीचा आनंद साजरा करतानाच एका निष्पाप मुलाला जीवनदान देण्यासाठी दाखवलेल्या या सामाजिक संवेदनशीलतेचे सर्व रत्नागिरीकरांकडून भरभरून कौतुक होत आहे.












